Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार! हातात ऊस घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या; पहिली उचल ₹५००० देण्याची मागणी!

धाराशिवमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार! हातात ऊस घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या; पहिली उचल ₹५००० देण्याची मागणी!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
यावर्षीच्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन पहिली उचल ५ हजार रुपये मिळावी, यासह इतर विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि. १) धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात ऊस घेऊन जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी स्वतः आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली व त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

​भाव ठरल्याशिवाय कारखाने सुरू करू न देण्याचा इशारा.
​स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने हातात ऊस घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. परिसरात शेतकर्‍यांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

​त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना सोपवण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील सहकारी, खाजगी, गुळ पावडर व खांडसरी कारखान्यांनी ऊसाचा अंतिम भाव ठरवल्याशिवाय आणि पहिली उचल ₹५,००० रोख स्वरूपात दिल्यासशिवाय कारखाने सुरू करण्यास परवानगी देऊ नये. यंदा खते, बियाणे आणि मजुरीचा खर्च दुप्पट झाल्यामुळे शेतकरी अडचणीत असून, भाव ठरल्याशिवाय कारखान्यांना गाळप परवाना किंवा बॉयलर अग्निप्रदीपनाची परवानगी देण्यात येऊ नये.

​स्वतंत्र काट्यावर ऊस वजनाची मुभा द्या!
​कारखान्यांमधील वजन काट्यांबाबत शेतकर्‍यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. ‘ऊस (नियंत्रण) आदेश १९६६’ आणि ‘वैधमापन शास्त्र अधिनियम २००९’ नुसार शेतकर्‍याला स्वतःच्या शेताच्या बांधावर, बाजार समितीच्या काट्यावर किंवा शासकीय अधिकृत वजन काट्यावर ऊसाचे वजन करून घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही कारखान्याने शेतकर्‍याला इतरत्र वजन करण्यापासून अडवू नये, असे कडक आदेश प्रशासनाने सर्व कारखान्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
​
​पहिली उचल: प्रतिटन ₹५,००० रोख स्वरूपात दिल्यानंतरच कारखाने सुरू करण्याची परवानगी द्यावी.
​साखर हमीभाव: साखरेचा हमीभाव ₹५,००० प्रतिक्विंटल करण्यात यावा.
​इथेनॉल दर: इथेनॉलचा दर ₹६५ वरून वाढवून ₹८५ प्रतिलिटर करावा; दरवाढ होईपर्यंत इथेनॉलसाठी ऊस गाळप करू नये.
​नफ्यात हिस्सा: कारखान्यांच्या वाढीव नफ्यातील ७०% रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देणे बंधनकारक करावे.

​आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी
​या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष तानाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेदे, संपर्कप्रमुख शहाजी सोमासे, राजभाऊ हाके, दुर्वास भोजने, संजय भोसले, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विष्णू काळे यांच्यासह रवि गरड, महादेव टेकाळे, कमलाकर पवार, दिलीप चव्हाण, उमेश शेळके, रामकृष्ण पाटील, मनोज सरवदे, नीलेश सरवदे, शंकर टेकाळे, बाळासाहेब टेकाळे, प्रकाश सरवदे, महेश सरवदे, माणिक घाटुळे, धोंडिबा साळुंके, उद्धव शेळके, शाम पाटील, श्रीकांत साळुंके, संजय शेळके, चंद्रकांत पाटील, संदीप जाधव, सतीश माने, अजित शेळके, ज्ञानेश्वर बंडगर, विकास मस्के, विष्णू पाडे, साहेबराव राऊत, प्रवीण कुलकर्णी, अण्णा नरवडे, विश्वंभर पाडे, बबन राऊत, संतोष कानाडे, नारायण जाधव, उत्रेश्वर कानाडे, सिद्धेश्वर कानाडे, रवि भंडारे आणि नीलेश मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india