मोठी बातमी: कागदपत्रांची अट बाजूला ठेवा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा! आमदार कैलास पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
तुळजापूर प्रतिनिधी:-
धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे १००% नुकसान झाले असून सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, पंचनामे करताना अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे विविध कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यावर धाराशिव-कलंब मतदारसंघाचे आमदार कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कागदपत्रांची अट न ठेवता सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
कागदपत्रांची सक्ती: पंचनाम्यादरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी (Farmer ID), आधार क्रमांक, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, मोबाईल क्रमांक आणि जीओ टॅगिंग फोटो इत्यादी कागदपत्रे मागितली जात आहेत.
शेतकऱ्यांना नाहक त्रास व भुर्दंड- आधीच दुष्काळामुळे गंभीर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना ही कागदपत्रे जमा करताना अनावश्यक अडचणी व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नेटवर्कची अडचण व मदतीपासून वंचित राहण्याची भीती- ग्रामीण भागात विशेषत- इंटरनेट कनेक्टिव्हिटीची मोठी अडचण असल्याने शेतकऱ्यांकडे आवश्यक माहिती तात्काळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे प्रत्यक्ष १००% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे अपूर्ण राहून ते शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
पंचनाम्याचा मूळ उद्देश- पंचनाम्याचा मुख्य उद्देश प्रत्यक्ष झालेल्या पीक नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करणे हा आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कोणताही पात्र शेतकरी नोंदीपासून राहू नये, यासाठी प्रथम प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे पंचनामे पूर्ण करणे आवश्यक आहे.
आमदारांची आक्रमक भूमिका-
दुष्काळी परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे १००% बाधित क्षेत्र म्हणून पंचनामे करताना कोणत्याही कागदपत्रांची अट न ठेवता सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी ठाम मागणी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.







