तुळजापूर तालुक्यात खळबळ: जवळगा मेसाई येथून ४५ वर्षीय पुरुषाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर तालुक्यातील जवळगा मेसाई येथून एका ४५ वर्षीय व्यक्तीचे अज्ञात इसमाने गैरकायदेशीररीत्या अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपहृत व्यक्तीच्या वृद्ध आईच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, जवळगा मेसाई (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील रहिवासी मधुकर उध्दव कदम (वय ४५ वर्षे) हे गत १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १६:०० वाजेच्या सुमारास गावातून अचानक गायब झाले. कोणातरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी त्यांना गुप्तपणे व गैरकायदेशीररीत्या डांबून ठेवण्याच्या उद्देशाने पळवून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.
बराच शोध घेऊनही मुलगा न सापडल्याने, अखेर अपहृत मधुकर कदम यांच्या आई मंगल उध्दव कदम (वय ६२ वर्षे, रा. जवळगा मेसाई) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांनी दि. ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) तुळजापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटना घडल्यापासून तब्बल १५ दिवसांनंतर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. अज्ञात आरोपीने मधुकर कदम यांचे अपहरण कोणत्या कारणासाठी केले, याचा शोध तुळजापूर पोलीस घेत असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.






