Best News Portal Development Company In India

धाराशिव: दुष्काळग्रस्त शेतमजुरांना मदत व गायरान जमिनी नियमित करा; अन्यथा १५ दिवसांत तीव्र आंदोलनाचा रिपब्लिकन सेनेचा इशारा!

धाराशिव: दुष्काळग्रस्त शेतमजुरांना मदत व गायरान जमिनी नियमित करा; अन्यथा १५ दिवसांत तीव्र आंदोलनाचा रिपब्लिकन सेनेचा इशारा!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
​धाराशिव जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, शेतमजूर आणि त्यांच्या कुटुंबांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण परिस्थितीत शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

​शेतमजुरांसाठी दुष्काळी उपाययोजनांची मागणी:
​रिपब्लिकन सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतमजुरांसाठी खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत-

​रोजगार हमी योजना (मनरेगा): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीने कामे उपलब्ध करून द्यावीत.
​सार्वजनिक कामे व जलसंधारण: गावांमध्ये जलसंधारणाची कामे, नाला खोलीकरण, बंधारे, रस्ते दुरुस्ती आणि वृक्षारोपण यांसारखी कामे तातडीने सुरू करावीत.

​आर्थिक मदत- सर्व शेतमजुरांना प्रत्येकी १०,०००/- रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यात यावे.
​कर्जमाफी व स्वयंरोजगार कर्ज: शेतमजूर महिलांचे बँकेचे, खाजगी फायनान्सचे व बचत गटांचे कर्ज माफ करावे. तसेच महात्मा फुले महामंडळाकडून बेरोजगार तरुणांना तातडीने कर्ज वाटप करण्यात यावे.

​हासेगाव (शि) येथील गायरान जमिनीचे नियमितीकरण करण्याची मागणी-
​दुसऱ्या निवेदनाद्वारे कळंब तालुक्यातील मौजे हासेगाव (शि) येथील गट क्रमांक २२९ मधील शासकीय गायरान जमिनीवर १९९० सालापासून (गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून) शेती करणाऱ्या अनुसूचित जाती (SC) व मागासवर्गीय भूमिहीन कुटुंबांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

​हे सर्व अर्जदार अत्यंत गरिबीत व प्रतिकूल परिस्थितीत जगत असून, त्यांच्या उपजीविकेचे आणि मुलांच्या शिक्षणाचे एकमेव साधन ही शेतीच आहे.

​शासनाच्या प्रचलित धोरणानुसार १९९० पूर्वीच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमाणाचा पंचनामा करून ही जमीन अधिकृतपणे त्यांच्या नावे नियमित करण्यात यावी, अशी नम्र विनंती करण्यात आली आहे.

​१५ दिवसांचा अल्टीमेटम व आंदोलनाचा इशारा:
​शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांच्या या न्याय्य मागण्यांचा तातडीने विचार न झाल्यास येत्या १५ दिवसांत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

​या निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, तालुकाध्यक्ष किशोर वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे, मुजिबभाई पठाण, गौतम बनसोडे, भाई फुलचंद गायकवाड, शंकर माने, सुरज वाघमारे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india