धाराशिवमधील भयाण दुष्काळाचा वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र सरकारला देऊन जास्तीत जास्त मदत मिळवून द्या!
आमदार प्रवीण स्वामी यांची नीती आयोगाच्या केंद्रीय पथकाकडे मागणी
करजखेडा येथे दुष्काळ पाहणी;
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि(१०)धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत भयाण झाली असून शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालक पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. केंद्र सरकारने या परिस्थितीची तात्काळ दखल घेऊन जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, यासाठी नीती आयोगाच्या केंद्रीय पथकाने धाराशिवमधील दुष्काळाचा वास्तववादी व वस्तुनिष्ठ अहवाल केंद्र सरकारला सादर करावा, अशी मागणी उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी केली.
केंद्राच्या नीती आयोगाच्या दोन सदस्यीय दुष्काळ पाहणी पथकाने आज (दि. १०) करजखेडा येथे भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. या भेटीदरम्यान आमदार प्रवीण स्वामी यांनी पथकाची भेट घेऊन त्यांना दुष्काळाच्या भीषण वास्तवाची जाणीव करून देणारे निवेदन सुपूर्द केले.
सलग आपत्तींमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला!
केंद्रीय पथकाशी चर्चा करताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की, “२०२४ मध्ये झालेली अतिवृष्टी, २०२५ मधील अतिवृष्टी आणि आता २०२६ मध्ये ओढवलेला भयानक दुष्काळ… या सलगच्या नैसर्गिक आपत्तींमुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांची दुरवस्था झाली आहे. या वर्षीचा खरीप हंगाम हातातून पूर्णपणे निघून गेला आहे. शेतामध्ये जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे आणि पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पुढे पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने रब्बी हंगामदेखील पूर्णपणे बेभरवशाचा झाला आहे.”
प्रतिहेक्टरी ₹५०,००० मदत: राज्य सरकारने विलंब न करता सर्व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ प्रतिहेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी.
दुष्काळामुळे रोजगार गमावलेले शेतमजूर आणि पशुपालकांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज लागू करावे.
जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठ्यांचे तात्काळ योग्य नियोजन करावे तसेच मूक पशुधन वाचवण्यासाठी शासकीय पातळीवर चारा-पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.
केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील भीषण वास्तव आपल्या अहवालात मांडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त निधी व मदत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे.
प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित
या पाहणी दौऱ्यादरम्यान नीती आयोगाचे केंद्रीय प्रतिनिधी डॉ. जसपाल सिंह, डॉ.साक्षी बांदोडिया, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर यांच्यासह जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद आणि महसूल विभागाचे विविध अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







