वागदरी पार्टी ते नळदुर्ग रोडची सहा महिन्यातच तीनदा दुरुस्ती करूनही दुरावस्थाचं : संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करावी जनतेची मागणी
——————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड) :
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते अक्कलकोट रोडवरील वागदरी पाटी ते नळदुर्ग नव्याने बनविलेल्या डांबरीकरण रस्त्याची सहा महिन्यात तीनदा दुरुस्ती करूनही ये रे माझ्या मागल्या म्हटल्याप्रमाणे जागोजागी खड्डे पडून अत्यंत दुरावस्था झालेली आहे.
याबाबत माहिती अशी की नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गचे दोन पदरी सिमेंट रोडचे काम शेतकऱ्याने अडवल्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडून अडवलेल्या ठिकाणी रोडची अत्यंत दुरावस्था झालेली होती. शासन प्रशासन आणि शेतकरी संघर्ष समिती यांनी समन्वयाने पूर्वी असलेल्या रोडचे किमान डांबरीकरण करून हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याच्या उद्देशाने सात-आठ महिन्यापूर्वीच या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु सदर डांबरीकरणाचे काम संबंधित गुत्तेदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे जागोजागी डांबरीकरण उकडून खड्डे कडून परत दुरावस्था झाली होती. परत जनतेतून रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली. जनतेची ओरड लक्षात घेऊन त्या रस्त्याची सहा महिन्यात तीनदा दुरुस्ती करण्यात आली परंतु तीनदा दुरुस्ती करूनही ये रे माझ्या मागल्या म्हटल्याप्रमाणे वागदरी पाटी ते नळदुर्ग या रस्त्यावर नव्याने केलेला डांबरीकरण रस्ता तीनदा दुरुस्त करूनही ऊस वाहतूक गाड्यांमुळे पुन्हा जागोजागी उघडून मोठे मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे वेळोवेळी तुळजापूर विधानसभेचे विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही संबंधित गुत्तेदार या रोडच्या दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात लक्ष देऊन सखोल चौकशी करून संबंधित गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करून या रस्त्याची पुन्हा चांगल्या दर्जाची दुरुस्ती करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.






