गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
संविधान विचार मंचाचा उपक्रम; मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याचीही व्यवस्था
उमरगा लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
धाराशिवचे माजी जिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी प्रवीण गेडाम यांच्या वाढदिवसानिमित्त संविधान विचार मंचाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅग, कंपास, पेन, वह्या, रंगीत पेन्सिली आणि पाण्याच्या बाटल्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, त्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याच उपक्रमांतर्गत निवासी मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी रुचकर नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव नव्हे, तर समाजातील गरजू घटकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची संधी आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावून आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून संविधान विचार मंचाने सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश दिला.
या प्रसंगी संविधान विचार मंचाचे अध्यक्ष अशोक बनसोडे, रतन पाटील, धर्मेंद्र ढोणे, प्रभारी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे आणि लक्ष्मण येवते उपस्थित होते. गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला.








