धाराशिव तालुक्यातील वडगाव, आश्रम शाळा परिसरात शालेय वाहनाचा थरारक अपघात; ३५ विद्यार्थ्यांचा टेम्पो उलटला, ३ गंभीर जखमी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव तालुक्यातील वडगाव आश्रम शाळा परिसरात गुरुवार दि. १८ सकाळी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. हॉटेल भाग्यश्रीसमोर सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत ३२ विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात टेम्पो चालकाच्याही डोक्याला मार लागला आहे.
उमरगा येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिरासाठी जात असताना ही घटना घडली. टेम्पोमध्ये एकूण ३५ विद्यार्थी, एक शिक्षक व चालक प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, मागून आलेल्या एका कारने अचानक कट मारल्याने टेम्पोचा तोल गेला.
त्याचवेळी उजव्या बाजूने जाणाऱ्या मोठ्या कंटेनरला टेम्पोची जोरदार धडक बसली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन उलटला. या अपघातात सहा विद्यार्थ्यांना अधिक मार लागल्याची माहिती जखमी शिक्षक कालिदास भगवान लोकरे यांनी दिली.
जखमी विद्यार्थ्यांमध्ये गणेश लिंबोळे याच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून नोमान शेख या विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या मेंदूला मार लागल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग पोलिस व आपत्कालीन सेवांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र चौहान यांनी सांगितले की, दोन विद्यार्थी व एक चालक यांना गंभीर स्वरूपाचा मार लागला असून त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती असून उपचारानंतर त्यांना दुपारपर्यंत घरी सोडण्यात येणार आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.






