’बाबा, घरातून बाहेर पडताना हेल्मेट नक्की वापरा!’
जिल्हा परिषद शाळा तेरखेडा येथे सपोनि यशवंत घोडके यांचा विद्यार्थ्यांना अनोखा संदेश; ‘गुड टच, बॅड टच’बाबत केले मार्गदर्शन!
तेरखेडा प्रतिनिधी:-
येरमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक प्रशाला, तेरखेडा येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रबोधनासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात येरमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) यशवंत घोडके यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ (चांगला स्पर्श व वाईट स्पर्श) याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच, रस्ते सुरक्षिततेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी त्यांनी लहान मुलांना एक महत्त्वाचे काम सोपवले—’वडिल किंवा भाऊ घरातून दुचाकीवरून बाहेर पडताना त्यांनी हेल्मेट वापरावे, यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज त्यांच्याकडे प्रेमाने हट्ट व विनवणी करावी.’
कार्यक्रमादरम्यान सपोनि घोडके यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे रक्षण कसे करावे, अनोळखी व्यक्तींशी कसे वागावे आणि कोणत्याही संशयास्पद प्रसंगी शिक्षक किंवा पालकांशी मोकळेपणाने संवाद कसा साधावा, याचे सोप्या भाषेत धडे दिले. सोबतच, अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे कसे गरजेचे आहे, हे पटवून देत ही सवय कुटुंबात रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या उपक्रमास शाळेतील शिक्षक बापू बडांगे, दीपक बांगर यांच्यासह इतर सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच येरमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार क्षीरसागर यांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले.
पोलीस प्रशासनाने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे व दिलेल्या संवेदनशील मार्गदर्शनाचे शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे.







