धाराशिववर पाणीटंचाईचे सावट: धरणांत केवळ ६.४४% पाणी; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन!
तुळजापूर प्रतिनिधी:-
पावसाळा संपत आला असतानाच धाराशिव जिल्ह्यावर तीव्र पाणीटंचाईचे ढग जमा होऊ लागले आहेत. वाढते तापमान, पाण्याचे वेगाने होणारे बाष्पीभवन आणि खालावणारी भूजलपातळी यांमुळे आगामी काळात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या आणीबाणीचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ ६.४४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, पुढील तब्बल १० महिने हेच पाणी पुरवून वापरावे लागणार आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे कळकळीचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
४१ दिवसांत १२.८५ दलघमी पाण्याची घट
जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता सुमारे ७२५ दशलक्ष घनमीटर (दलघमी) आहे. १ सप्टेंबर रोजी या प्रकल्पांमध्ये ५९.६ दलघमी साठा उपलब्ध होता. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे अवघ्या ४१ दिवसांत (११ ऑक्टोबरपर्यंत) हा साठा घटून ४६.७५ दलघमी वर आला आहे. म्हणजेच महिनाभरात १२.८५ दलघमी पाणी कमी झाले आहे.
उष्णतेचा पारा वाढला; भूजलपातळीतही मोठी घसरण-
यंदा ऑक्टोबर महिन्यात नेहमीपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत आहे. सर्वसाधारणपणे ३० ते ३१ अंश सेल्सिअस असणारे कमाल तापमान यंदा ३४ ते ३५ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. दुसरीकडे, भूजलपातळीतील घसरण १ सप्टेंबर रोजी ६ मीटर होती, ती ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात थेट ८.६६ मीटरपर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींच्या पाणी उपलब्धतेवरही मोठा परिणाम होणार आहे.
२०१५ च्या भीषण दुष्काळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियोजन-
सन २०१५ मध्ये धाराशिव जिल्ह्याने अत्यंत भीषण पाणीटंचाईचा सामना केला होता. त्यावेळी जलसाठा अवघा १२ दलघमीवर आला होता आणि नागरिकांची तहान भागवण्यासाठी ४६८ टँकर सुरू करावे लागले होते. तशी भयानक वेळ पुन्हा येऊ नये म्हणून प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती: संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी प्रत्येक गावात नोडल अधिकारी तैनात केले आहेत.
प्राधान्यक्रम: पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा-पाणी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे.
”पाणीटंचाईचा सामना करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
सर्व राजकीय पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून सामूहिक जबाबदारीने एकत्र यावे. नागरिकांनी पाण्याचा एक-एक थेंब जपून वापरल्यास आपण या संकटावर मात करू शकतो.”
— आ. राणाजगजितसिंह पाटील.







