साखर विक्रीतून येणाऱ्या रकमेतून शेतकऱ्यांचे सर्व थकीत बिले देणार – राजाराम घावटे पाटील
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
स्वर्गीय दादांच्या दुःखद निधनानंतर क्युनर्जी इंडस्ट्रीज कडून आमच्या राजगंगा ग्रुपला हा कारखाना हस्तांतरित करण्यात आला .हस्तांतरित करण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी वर मात करून आम्ही कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत .या प्रक्रियेमुळे शेतकरी बांधवांचे थकलेले ७० कोटी बिलापैकी आम्ही ६५ कोटी रुपये दिलेले आहेत .उर्वरित थकीत बिले साखर विक्री करुण देणार आहोत .फक्त बिले देणेच हे उद्दिष्ट नसून हा कारखाना चालू झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .आंदोलक शेतकऱ्यांनी संयमाची भूमिका ठेवावी व साखर विक्रीसाठी सहकार्य करावे .असे उमरगा येथील तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनात दि . १४ रोजी राजगंगा ग्रुपचे संचालक राजाराम घावटे पाटील यांनी आवाहन केले .
मागील दीड ते दोन महिन्यापासून भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना लि समुद्राळ संचलित राजगंगा शुगर मील लि .च्या शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे .कारखाना गेटवर व तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलकांनी वेळोवेळी ठीया आंदोलन केले .टप्प्याटप्प्याने राजगंगा ग्रुपने शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल वेळोवेळी दिले आहे .आंदोलकांनी कारखाना गेटवर वाहने अडवल्याने आत्तापर्यंत साखरेचे एकही पोते विक्री झाले नसून साखर जशीच्या तशी आहे . उर्वरित थकीत बिल साखर विक्रीतून येणाऱ्या रकमेतून दररोज खात्यावर जमा करणार असल्याचे आंदोलक शेतकरी तसेच आ प्रविण स्वामी ,तहसीलदार गोविंद येरमे , पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत त्यांनी मान्य केले .
साखर विक्रीतुन येणारी दररोजची रक्कम ऊस बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल .शेतकऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अडवलेली साखर विक्री करण्यासाठी सहकार्य करावे .शेतकऱ्यांचे व वाहतूकदारांचे सर्व बिल अदा करून कारखाना त्वरित सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .अजितदादांचा परिसरस्पर्श झालेला हा भाऊसाहेब बिराजदार कारखाना आहे .सुरेश बिराजदार व संचालक मंडळांनी प्रचंड कष्टातून आपल्या भागासाठी उभारलेला हा कारखाना त्याच सन्मानाने चालवणे आमचे कर्तव्य आहे .शेतकरी सभासद आणि ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी संयम ठेवून सहकार्याची भावना ठेवावी अशी विनंती केली आहे .यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक शेतकरी उपस्थित होते .






