*वाचनालये समाजाच्या वैचारिक प्रगतीची केंद्रे व्हावीत : ॲड. शीतल चव्हाण*
*श्रीकृष्ण विद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात; वाचन संस्कृती रुजविण्याचा संदेश*
उमरगा/प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
( दि.१६)वाचनामुळे माणसाची चिकित्सक दृष्टी विकसित होते. स्वतंत्र विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि सामाजिक समस्यांकडे विवेकाने पाहण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे वाचनालये ही केवळ पुस्तकांची भांडारे न राहता समाजाच्या वैचारिक प्रगतीची केंद्रे बनली पाहिजेत. सुशिक्षितांचे मौन समाजहितासाठी घातक ठरू शकते, असे प्रतिपादन ॲड. शीतल शामराव चव्हाण यांनी केले.
श्रीकृष्ण विद्यालय, गुंजोटी येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर हिरवे होते.
ॲड. चव्हाण यांनी वाचन संस्कृतीसमोरील आव्हाने आणि उमरगा परिसरातील वाचनालय चळवळीचा प्रवास उलगडला. वाचनालयांच्या उभारणीतील अडचणी, शासकीय वाचनालयांच्या कारभारातील अनियमितता आणि घटती वाचनसंस्कृती यांवर त्यांनी परखड भाष्य केले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता चरित्रे, इतिहास, विज्ञान आणि वैचारिक साहित्याचे वाचन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
वाचन संस्कृती लोकजीवनात रुजविण्यासाठी मकरसंक्रांतीला ‘पुस्तक घ्या, पुस्तक द्या, पुस्तक वाचा’, गुढीपाडव्याला ‘पुस्तकांची गुढी’, गणेशोत्सवात ‘पुस्तक वाचणारा गणपती’ आणि दसऱ्याला ‘विवेकयात्रा’ अशा अभिनव उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सण-उत्सवांनाही ज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाची जोड मिळाली पाहिजे, असे ते म्हणाले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यावर थॉमस पेन यांच्या राइट्स ऑफ मॅन या ग्रंथातील विचारांचा झालेला प्रभाव आणि भगतसिंग यांच्या क्रांतिकारी विचारांचा संदर्भ देत त्यांनी वाचनाचे समाजपरिवर्तनातील महत्त्व स्पष्ट केले. डिजिटल युगातही छापील पुस्तकांचे महत्त्व जपण्याची गरज व्यक्त करतानाच दुष्काळासारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यालयातील शैक्षणिक उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले.
प्रारंभी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक रविराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. बसवराज पुरंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पर्यवेक्षक अविनाश पाटील यांनी समारोप करताना विद्यार्थ्यांना नियमित वाचनाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी संगाय्या स्वामी, वैशालीताई कदेरे, प्रशासकीय सहाय्यक अभयकुमार हिरास, उपमुख्याध्यापक सत्यवान भालेराव यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमशंकर कुंभार यांनी केले, तर श्रीकृष्ण रंगदळ यांनी आभार मानले.







