मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची जादू; भावना नानजकर यांना विभागीय प्रथम, राज्यस्तरावर झेप!
उमरगा : गो. ल. कांबळे
शहरातील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या विशेष शिक्षिका भावना नानजकर यांनी शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लातूर-नांदेड-धाराशिव या विभागीय स्पर्धेत भावना नानाजकर यांनी आपल्या अभिनव व उपयुक्त शैक्षणिक साहित्याद्वारे परीक्षकांचे लक्ष वेधत विभागातून अव्वल क्रमांक मिळवला.
आता जानेवारी महिन्यात ठाणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धेत त्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. बी. आर. कलवले यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






