Best News Portal Development Company In India

कुलदीप मगर हल्ल्याप्रकरणी भाजपचा तीव्र निषेध राजकारण बाजूला ठेवा, दोषींनाच शिक्षा द्या.

कुलदीप मगर हल्ल्याप्रकरणी भाजपाचा तीव्र निषेध; राजकारण बाजूला ठेवा, दोषींनाच शिक्षा द्या!

सीसीटीव्ही-सीडीआर तपासूनच कारवाई करा; निर्दोषांची नावे गोवण्याचा डाव हाणून पाडा – भाजपाची मागणी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

कुलदीप मगर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोषींवर कठोर कार्यवाही करावी तसेच कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष तपास करावा, अशी ठाम मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत दि. १९ डिसेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख व पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यामार्फत मा. पोलीस अधीक्षक, रितू खोकर धाराशिव यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दि. १६ रोजी सायंकाळी शहरातील काही तरुणांनी कुलदीप मगर यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना निषेधार्ह असून भारतीय जनता पक्षाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासाअंती कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता, कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली न येता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व सीडीआर तपासून सत्याधारित कार्यवाही करावी, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फे पिटू गंगणे यांचे राजकीय विरोधक विनाकारण नाव घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत निर्दोष व्यक्तींची नावे गुन्ह्यात घेऊ नयेत, अशी ठाम मागणी भाजपाने केली आहे.

निवेदन देताना माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजपा तालुका अध्यक्ष आनंद कंदले यांच्यासह राम चोपदार, राजेश्वर कदम, सागर कदम, किशोर साठे, विशाल रोचकरी, नितिन साठे, भरत कोळगे, सौदागर पौळ, विकास साठे, औदुंबर कदम, सचिन साळुंके, राहुल भोसले, गोपाळ पवार, दिपक निकम, नानासाहेब लोंढे, दादाराव जमदाडे, भरत इंगळे, विशाल छत्रे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित तसेच महिलांचा निवेदन देताना सहभागही लक्षणीय होता.

तपास पूर्णपणे निष्पक्ष राहील; सत्यतेच्या आधारेच पुढील कार्यवाही केली जाईल !

प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सर्व बाबींची सखोल पडताळणी केली जाईल. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व उपलब्ध माहितीच्या आधारे सत्यता तपासून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल,
– पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, तुळजापूर.

कुलदीप मगर हल्ला प्रकरणात भारतीय जनता पार्टी कसलाही पाठिंबा देणार नाही. आमचा कोणताही कार्यकर्ता अथवा नागरिक दोषी आढळल्यास त्यालाही संरक्षण दिले जाणार नाही. पोलीस प्रशासनाने सीडीआर व सीसीटीव्हीच्या आधारे निष्पक्ष तपास करून दोषींना कठोर शासन करावे. मात्र विनाकारण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद उर्फे पिटू गंगणे यांचे नाव या प्रकरणात गोवू नये,
– गटनेते संतोष परमेश्वर, तुळजापूर

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india