१० हजार हफ्त्यासाठी वाईन शॉप चालकाला किडनॅपची धमकी! तुळजापूरात दहशत; तिघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर शहरात खंडणीखोरांची दहशत पुन्हा एकदा उफाळून आली असून, हफ्ता दे नाहीतर तुझ्या मुलाचं अपहरण करू अशी थरकाप उडवणारी धमकी देत वाईन शॉप चालकाकडून जबरदस्तीने माल उचलून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
तुळजापूर येथील जुने बसस्थानक परिसरातील चेतन वाईन शॉप येथे दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
प्रशांत कांबळे, बालाजी जाधव व बाबा शेख (सर्व रा. तुळजापूर) या तिघांनी वाईन शॉप चालक अमर श्रीराम नाईक (वय ५२) यांना व त्यांच्या मुलाला किडनॅप
करण्याची धमकी देत ३,१०० रुपयांचा माल जबरदस्तीने उचलून नेला.
इतक्यावरच न थांबता, आरोपींनी दर महिन्याला १०,००० हफ्ता दे,अन्यथा “तुझ्या मुलाला उचलून नेऊ” अशी जीवघेणी धमकी देत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या प्रकरणी फिर्यादी अमर नाईक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, खंडणीखोरांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे.






