मानवतेला काळीमा : मूकबधीर तरुणावर काठ्या-लाथाबुक्क्यांचा कहर; केंद्रिय मंत्र्यांनी घेतली दखल, कडक कारवाईचे आदेश!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील जगदाळे कॉम्प्लेक्स परिसरात मूकबधीर तरुणावर काठ्या व लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराने समाजमन हादरून गेले आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिंदे शिवसेना तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी तातडीने पुढाकार घेत केंद्रिय मंत्री प्रताप जाधव यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत संपूर्ण प्रकार मंत्र्यांच्या कानावर घातला. त्यानंतर मंत्र्यांनी स्वतः तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्याशी थेट संवाद साधत घटनेची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी केंद्रिय मंत्री प्रताप जाधव यांनी दोषींवर कोणतीही दया न दाखवता कडक व कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले. “मूकबधीर व्यक्तीवर झालेली मारहाण ही केवळ गुन्हा नसून मानवतेवरचा हल्ला आहे. अशा नराधमांना शासन झालंच पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पोलिस प्रशासनाकडून तपासाला वेग देण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
मूकबधीर तरुणावर झालेल्या या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण तुळजापूर तालुका हादरून गेला असून, न्यायासाठी आता सर्वांचे लक्ष पोलिस कारवाईकडे लागले होते मात्र पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर पोलीस ठाण्यात तात्काळ पाच दोषींवर गंभीर स्वरूपाचे गन्हे दाखले केले आहेत.घटनेनंतर जखमी राजेश पवार यास तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.






