Best News Portal Development Company In India

राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाची राज्य कार्यकारिणी सभा पुण्यात संपन्न

*राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघाची राज्यकार्यकारणी सभा पुण्यात संपन्न*

पुणे/नळदुर्ग (एस.के.गायकवाड)
राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांची ४ थी राज्यकार्यकारणी सभा रविवारी, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे उत्साहात पार पडली. संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून विविध महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
या सभेस प्रमुख अतिथी म्हणून विद्या प्राधिकरण सभेचे कार्यवाहक व संघटनेचे सल्लागार डॉ. सतीश गवळी, राज्य प्रवक्ता सुनील गुरव, राज्य सरचिटणीस अनंता जाधव, राज्य सल्लागार परसराम हेंबाडे, राज्य उपाध्यक्ष संभाजी ठुबे, राज्य प्रतिनिधी अजय टाले, भैरवनाथ कानडे यांच्यासह राज्य व जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी दिवंगत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे नातेवाईक, संघटनेतील सदस्य तसेच यावर्षी निधन झालेल्या राजकीय नेते, साहित्यिक व समाजसुधारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यानंतर उपस्थित मान्यवर व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. धाराशिव येथील विक्रम पांचगे यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वागतगीताने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचे वाचन राज्य सरचिटणीस अनंता जाधव यांनी केले. त्यावर उपस्थित सभासदांनी सखोल चर्चा करून सर्व ठराव एकमताने मंजूर केले. यामध्ये संघटनेचा विस्तार अखिल भारतीय पातळीवर करण्यास मान्यता, वर्षातून दोन ऑनलाइन व एक ऑफलाइन बैठक घेणे, एप्रिल किंवा मे महिन्यात मुंबई येथे राज्य अधिवेशन आयोजित करणे, राज्य कार्यकारणीचे पुनर्गठन, कोअर कमिटीची स्थापना, सभासद शुल्क वाढ, विद्यार्थी व शाळा हिताचे उपक्रम राबविणे, निष्क्रिय पदाधिकारी व बैठकीस अनुपस्थित राहणाऱ्यांवर कारवाई करून नव्या नियुक्त्या देणे तसेच संघटनेच्या उपविधी दुरुस्त करण्यासारख्या ठरावांचा समावेश होता. संघटनात्मक पातळीवर विशेष निर्णय घेण्याचे अधिकार राज्याध्यक्षांना देण्यात आले.
यावेळी नव्याने नियुक्त जिल्हाध्यक्षांना राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर व कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न करणे, जिल्हा बैठका घेऊन जिल्हा शाखा सक्रिय करणे आणि विभागीय मेळावे घेऊन विभागीय कार्यकारणी पुनर्गठित करण्याचे ठरावही मंजूर करण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक राज्य प्रतिनिधी प्रमोद राऊत (सातारा) यांनी केले. सूत्रसंचालन पूजा भुरके यांनी केले, तर आभारप्रदर्शन पुणे जिल्हाध्यक्ष शामराव इंदोरे यांनी केले. ही सभा यशस्वी करण्यासाठी राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण डांबलकर, दिलीप चौधरी, अमृत पाटील, संतोष दातीर, रविंद्र जाधव, शिवाजी चव्हाण, समाधान शिकतोडे, विक्रम पाचंगे ,अशोक खडके, चित्रा गवारे, डॉ. सतीश सातपुते, सुखदेव भालेकर, कुंडलिक पवार, मनोज नायकवाडी, मनिषा शेजोळे, मेधा कानिटकर, छाया जगदाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india