*हायवेवर दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी एलसीबीच्या जाळ्यात;स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक इज्जपवार पॅटर्न ने सात आरोपी गजाआड
दोन पिकअपसह तलवार-रॉड जप्त; १०.८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
हायवेवर वाहन अडवून दरोडे टाकणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मोठा कट उधळून लावला आहे.पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सात सराईत आरोपींना दरोडा टाकण्याच्या तयारीत असतानाच गजाआड केले.
येरमाळा व कळंब हद्दीत हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर लुटमारीचे प्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर एलसीबीचे पथक रात्रगस्त पेट्रोलिंग करत होते. याच दरम्यान कळंब-केज रोडलगत, कळंब शहरातील द्वारकानगरीजवळील बंद पेट्रोलपंप परिसरात संशयास्पदरीत्या दोन पिकअप वाहने व काही इसम थांबलेले दिसून आले. पथकाचे वाहन पाहताच काही इसम पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीस अंमलदारांनी तत्काळ कारवाई करत त्यांना जागेवरच ताब्यात घेतले.सखोल चौकशीनंतर आरोपींनी आपली नावे चंदर भास्कर काळे (३५), सुभाष उर्फ हरी भास्कर काळे (३७), शामसुंदर बिभीषण काळे (३४) (तिघे रा. कन्हेरवाडी पाटी, ता. कळंब),नवनाथ अनिल शिंदे (२६), राहुल अनिल शिंदे (२४) (रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा, ता. वाशी),बालाजी माणिक काळे (३९, रा. शिराढोण) व
दत्ता हिरा पवार (३४, रा. लोहमाटा पूर्व, ता. कळंब)
अशी सांगितली.पंचासमक्ष तपासणीदरम्यान दोन पिकअप वाहनांतून लोखंडी धारदार तलवार, स्टील रॉड, चार मोबाईल असा दरोड्यासाठीचा साहित्य मिळून आला. आरोपींकडून एकूण १० लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात या सर्व आरोपींवर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी व वाहन चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, तसेच पोलीस अंमलदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, अमोल निंबाळकर, दयानंद गादेकर, बळीराम शिंदे, अशोक ढगारे, पुष्कर मुंगळे, चापोह महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.






