तुळजापुरात खुलेआम गुटखाविक्री – पानशॉप चालकावर गुन्हा दाखल
तुळजापूर | प्रतिनिधी
राज्य शासनाने गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर कडक बंदी घातलेली असताना, तुळजापूर शहरात मात्र गुटखा माफियांचे फावत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. सावरकर चौक परिसरात खुलेआम प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू असल्याचा संतापजनक प्रकार तुळजापूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.दि. ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, सावरकर चौकातून नळदुर्ग रोडकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या ॲक्सीस बँकेसमोर ‘शुभम पान शॉप’ येथे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत विकास रेवप्पा चंदनशिवे (वय ४३, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विमल पानमसाला व डायरेक्टर पानमसाला विक्रीसाठी साठवून ठेवताना आढळून आला.
पोलिसांनी आरोपीकडून ९१८ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा जप्त केला. शहरातील तरुणाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणी सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ (जाहिरात प्रतिबंध व वाणिज्य, पुरवठा व वितरण नियमन) अधिनियम २००३ मधील कलम ६(अ) व २४ अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▪️ प्रश्न उपस्थित होतो की, शहरात बंदी असलेला गुटखा येतो कुठून?
▪️या मागे कोणाचा आशीर्वाद आहे का?
▪️ लहान पानठेल्यांपर्यंत माल पोहोचवणाऱ्या गुटखा माफियांवर कारवाई कधी?
तुळजापूर पोलीस कारवाई करत असले तरी, गुटखा माफियांचे मूळ उखडण्यासाठी अधिक व्यापक आणि कठोर मोहिमेची गरज असल्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.






