राजकीय आकसातून देवीच्या श्रद्धेवर घाला; “प्रसादाला ड्रग्ज” वक्तव्याचा तुळजापूरमध्ये जाहीर निषेध
आमदार तानाजी सावंतांनी तत्काळ जाहीर माफी मागावी – पुजारी बाळासाहेब भोसले
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
ड्रग्जप्रकरणातील आरोपीला भाजपने नगराध्यक्ष केले असून, आता तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ड्रग्जच्या पुड्याही वाटल्या जातील, असे अत्यंत बेजबाबदार व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य आमदार तानाजी सावंत यांनी केल्याने तुळजापूर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा नागरिकांसह विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी जाहीर शब्दांत निषेध नोंदवला असून, राजकारणासाठी देवदेवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.आमदार सावंत यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर केलेल्या या वादग्रस्त टीकेमुळे शहरातील वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष गंगणे यांच्या समर्थकांनी या वक्तव्याचा तीव्र समाचार घेत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या नगराध्यक्षांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. शहराच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या नेतृत्वावर अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे जनतेचा विश्वास डळमळीत होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, श्रीक्षेत्र तुळजापूर येथील आई तुळजाभवानी देवींचे पुजारी बाळासाहेब भोसले यांनी आमदार सावंत यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय स्वार्थासाठी आई तुळजाभवानीच्या पवित्र नावाचा अपमान करणे हा गंभीर अपराध असून, प्रसाद, मंदिर आणि श्रद्धेची विटंबना करणारी भाषा कुठलाही सुसंस्कृत नेता वापरत नाही. या वक्तव्याने कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, आमदार सावंत यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी ठाम मागणी भोसले यांनी केली आहे.
भोसले यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, तुळजापूरचा सर्वांगीण विकास, मंदिर परिसराचा दर्जा उंचावणे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मात्र, विरोधकांकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.या वादग्रस्त वक्तव्यानंतर तुळजापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, येत्या काळात आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात जनआक्रोश अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. तुळजापूरची श्रद्धा आणि अस्मिता यावर आघात करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.






