दिर–भावजयीच्या अनैतिक संबंधात अडसर ठरलेला १३ वर्षीय मुलगा कुऱ्हाडीने केला खात्मा !
तामलवाडी पोलिसांचा धडाकेबाज तपास; २४ तासांत आरोपी चुलत्याच्या मुसक्या आवळल्या
तुळजापूर | ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिर–भावजयीच्या प्रेमसंबंधांची पोलखोल वडिलांपर्यंत पोहोचवत असल्याचा राग मनात धरून, एका निर्दयी चुलत्याने आपल्या १३ वर्षीय पुतण्याचा दिवसाढवळ्या निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना
तामलवाडी साठवण तलावाजवळ उघडकीस आली आहे. मात्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तामलवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत खुनाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या, ही बाब कौतुकास्पद ठरली आहे.
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी शिवारात कदम यांची शेती असून, सदर शेती दत्ता कोरे हे बटईने करीत होते.उमरगा तालुक्यातील कोळसूर गावचा ओमकार देवीदास कांबळे हा आपल्या भावजयी ज्योती कांबळे हिच्यासह सालगडी म्हणून काम करत होता. ज्योती कांबळे यांचा १३ वर्षीय मुलगा कृष्णा उर्फ सदानंद कांबळे हा कधी वडिलांकडे तर कधी आईकडे राहत होता.
कृष्णा हा आई व चुलता यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती आपल्या वडिलांना देत असल्याने तो दिर–भावजयीच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. याच रागातून १ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, आरोपी ओमकार कांबळे याने तलावातील पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपाचा पाईप बसवण्याच्या बहाण्याने कृष्णाला तामलवाडी साठवण तलावाजवळ नेले. तेथे कुऱ्हाडीचे सपासप वार करून कृष्णाचा निर्घृण खून केला आणि मृतदेह तलावाशेजारील गवतामध्ये फेकून आरोपी पसार झाला.
▪️गुराख्याच्या सतर्कतेमुळे खून उघड
दि.५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास,धनाजी नेटके हे तलाव परिसरात जनावरे चारत असताना गवतामधून मृतदेहाचे पाय दिसून आले. त्यांनी तत्काळ तामलवाडी पोलिसांना माहिती दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहावरील गंभीर जखमांवरून हा खून असल्याचे स्पष्ट झाले.प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र,सहाय्यक पोलीस निरीक्षक ठाकूर यांनी तपासाची सूत्रे अत्यंत काटेकोरपणे हाती घेतली आणि काही तासांतच संशयाची सुई चुलता ओमकार कांबळे याच्याकडे स्थिरावली.
▪️२४ तासांत खुनाचा उलगडा
कृष्णा कांबळे खूनप्रकरणी तपास सुरू करताना तामलवाडी पोलिसांनी प्रथम बसस्थानक परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर आरोपीचा मोबाईल लोकेशन ट्रेस करत पथक थेट तलमोड,उमरगा तालुका येथील टोलनाक्यापर्यंत पोहोचले.पुढे कोळसूर गावात आरोपी ओमकार देवीदास कांबळे हा घरी परतत असतानाच तामलवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्यास तामलवाडी पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर करीत आहेत.
१३ वर्षीय कृष्णा कांबळे खूनप्रकरणी पोलीस अधीक्षक रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना,
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्यासह जुबेर काझी, दिनकर तोगे, सुरज नरवडे, उमेश माने, नजीर बागवान, तुराब शेख, हनमंत कोरे,नितीन भोसले
यांनी विशेष परिश्रम घेतले.






