Best News Portal Development Company In India

प्रसादाला” ड्रग्ज म्हणणाऱ्या आमदारावर एफ आय आर करा : तुळजापुरात संताप उसळला!

प्रसादाला “ड्रग्ज” म्हणणाऱ्या आमदार सावंतांवर एफआयआर करा; तुळजापुरात संताप उसळला !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजाभवानी देवीच्या प्रसादाबाबत व गाभाऱ्याच्या पवित्रतेविषयी माजी पालकमंत्री आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे तुळजापुरात संतापाची लाट उसळली आहे. या विधानांमुळे देवीचा अवमान झाला असून भक्तांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्याचा आरोप करत पुजारी वर्गाने जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. आमदार सावंत यांच्यावर तात्काळ FIR दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.ढोकी येथे ५ जानेवारी रोजी झालेल्या जाहीर सभेत आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी देवीच्या प्रसादासंदर्भात “ड्रग्जची पुडी”असा उल्लेख केला. तसेच गाभाऱ्याला कशाला हात लावता? पवित्र्य राहणार आहे का? पवित्र्य नष्ट करण्याचे पाप केले अशा स्वरूपाची विधाने केली. या वक्तव्यांतून देवीच्या, मंदिराच्या पवित्रतेचा व भक्तांच्या श्रद्धेचा जाणीवपूर्वक अवमान करण्यात आल्याचा गंभीर आरोप पुजारी वर्गाने केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रसादाबाबत केलेले विधान हे केवळ राजकीय भाष्य नसून ते देवतेच्या पवित्रतेवर थेट आघात करणारे आहे. या विधानांमुळे अमली पदार्थांबाबत चुकीचा आणि धोकादायक संदेश जात असून,भक्तांमध्ये संभ्रम, संताप व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हाधिकारी हेच मंदिर संस्थानचे अध्यक्ष असल्याने या विधानांतून मंदिर प्रशासनावरही अप्रत्यक्ष आरोप केला गेल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
तसेच गाभाऱ्याच्या पवित्रतेविषयी केलेल्या वक्तव्यांतून मंदिर व्यवस्थापनावर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असून श्रद्धास्थानाबाबत अवमानकारक संदेश समाजात पसरविला जात असल्याचे पुजारी वर्गाचे म्हणणे आहे. या वक्तव्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत धार्मिक भावना दुखावणे, समाजात वैर व द्वेष पसरविणे, सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणे, मानहानी तसेच NDPS कायद्याअंतर्गत अमली पदार्थांना अप्रत्यक्ष प्रवृत्त करणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.यासोबतच संबंधित व्हिडिओ व ऑडिओ क्लिप्स, माध्यमांतील कात्रणे व सोशल मीडियावरील पोस्ट्स जप्त करून डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक संरक्षण करावे, दोषींना सार्वजनिक माफी किंवा स्पष्टिकरणास भाग पाडावे, तसेच मंदिर संस्थानकडून अधिकृत खंडन प्रसिद्ध करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. भविष्यात मंदिर, देवी किंवा संस्थांबाबत अपमानास्पद संदर्भ टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश काढावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.या निवेदनावर तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, संदीप केवडकर, महेश खंदारे, अमर हंगरगेकर यांच्यासह अन्य पुजाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india