तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध!
आई तुळजाभवानीच्या पुण्यनगरीत प्रथमच जीवनदायी आरोग्यसेवा नव्याने सुरू करण्यात आलेली आहे
तुळजापूर प्रतिनिधी/
तीर्थक्षेत्र आई तुळजाभवानीच्या पुण्यनगरीत आरोग्यसेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले असून, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात मोफत व अत्याधुनिक डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे शहरी व ग्रामीण भागातील किडनी रुग्णांना आता उपचारासाठी सोलापूर, धाराशिव किंवा पुण्यासारख्या शहरांची पायपीट करावी लागणार नाही. ही सेवा अनेक गरजू रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे किडनी विकाराचे प्रमाण वाढले असून डायलिसिस हा नियमित व महागडा उपचार असल्याने अनेक रुग्ण आर्थिक अडचणीत सापडत होते. मात्र आता तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात ही सेवा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध झाल्याने गरीब, गरजू व ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्णालयातील डायलिसिस विभागात उच्चशिक्षित व अनुभवी तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत असून, दोन किडनी रोग तज्ञ (MBBS, MD, DM), वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि अनुभवी डायलिसिस टेक्निशियन रुग्णसेवेत अहोरात्र कार्यरत आहेत. प्रत्येक रुग्णावर वैयक्तिक लक्ष देत अत्यंत काळजीपूर्वक उपचार केले जात आहेत.
रुग्णांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत अत्याधुनिक मशिनरी, सिंगल युज साहित्य, स्वच्छ व निर्जंतुक वातावरण राखले जात आहे. डायलिसिसदरम्यान रुग्णांना मानसिक आधार मिळावा यासाठी संवेदनशील व आपुलकीची सेवा दिली जात आहे.विशेष म्हणजे या सुविधेत रुग्णांना लागणारी सर्व औषधे, रक्तवाढीसाठी लागणारी महागडी इंजेक्शन्स, आवश्यक तपासण्या तसेच जेवण व इतर सेवा देखील मोफत दिल्या जात आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीमुळे उपचार थांबवावे लागणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे.या महत्त्वपूर्ण आरोग्यसेवेचे प्रभावी नियोजन जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. धनंजय चाकूरकर तसेच तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व तांत्रिक कर्मचारी ग्रामीण भागासह इतर शहरांतील गरजू रुग्णांनाही सेवाभावाने उपचार देत आहेत.
तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील ही मोफत डायलिसिस सुविधा म्हणजे शासनाच्या आरोग्य धोरणाची प्रभावी अंमलबजावणी असून, आई तुळजाभवानीच्या पुण्यनगरीत आरोग्यसेवेचा नवा विश्वास निर्माण करणारा ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. या कार्याबद्दल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधानाचे वातावरण असून रुग्णालय प्रशासनाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.






