शिक्षण सभापतींची न. प. शाळेला अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक!
तुळजापूर (प्रतिनिधी):
तुळजापूर येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे नगरपरिषद शालेय शिक्षण सभापती तथा नगरसेविका सौ. नीता दिनेश क्षिरसागर यांनी अचानक सदिच्छा भेट देत शाळेची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता प्रत्यक्ष तपासून पाहिली.
विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज घेतला असता, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद समाधानकारक व उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील शैक्षणिक कामकाज, शिक्षकांचे नियोजन, तसेच राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली आणि या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांना अधिकाधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून त्यासाठी पारितोषिके जाहीर करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढून गुणवत्ता उंचावण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी लोहारे केरण यांनी सौ. नीता क्षिरसागर यांचा सत्कार केला. कार्यक्रमास युवा नेते दिनेश क्षिरसागर, मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र पाटील, बाळासाहेब जेटीथोर, महेंद्र कावरे, सुज्ञानी गिराम, विद्यादेवी स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याची भावना यावेळी दिनेश क्षिरसागर यांनी व्यक्त केली.






