श्री तुळजाभवानी संस्थांनमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी ! तुळजापूर (प्रतिनिधी) : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठा उत्साह पाहण्यास मिळाला.
आज सकाळी मंदिर परिसरातील गणेश विहार येथे तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिवजयंतीच्या निमित्ताने आज आई तुळजाभवानी देवी यांची भवानी तलवार अलंकार महापूजा विशेष श्रद्धेने मांडण्यात आली होती. लोकधारणेनुसार, तुळजाभवानी देवीने प्रसन्न होऊन स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार प्रदान केली होती. या ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी ही विशेष महापूजा आयोजित केली जाते.
आज पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. संपूर्ण मंदिर परिसर “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. भक्तिमय वातावरणामुळे प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आणि उत्साह दिसून येत होता.
शिवजयंती निमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे तरुणांमध्येही शिवरायांविषयी आदर आणि प्रेरणा दिसून आली.
शिवरायांचे विचार, त्यांचा स्वराज्याचा आदर्श आणि समाजासाठी केलेले कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदाचाही उत्सव याच भावनेतून साजरा करण्यात आला.
या वेळी लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, ओंकार काटकर, लेखापाल तेजस कऱ्हाळे, सहायक सुरक्षा निरीक्षक नवनाथ खिंडकर, सहायक स्वच्छता निरीक्षक दयानंद जोगदंड यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तुळजाई एक्सप्रेसच्या माध्यमातून सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, शिवरायांचे विचार आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






