महिला दिनानिमित्त तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!
तुळजापूर प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर तसेच आरोग्य विभाग यांच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंदिर परिसरातील दर्शन मंडप, पहिला मजला येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरास महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तसेच इतर आवश्यक तपासण्या करण्यात आल्या. उपस्थित डॉक्टरांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन करत नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.
मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर श्री कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या संकल्पनेतून या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष मा. श्री कीर्ती किरण पुजार यांच्या कन्या कु. आर्ना पुजार यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या पत्नी सौमय्याश्री पुजार, तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली काळे यांनी विशेष सहकार्य केले.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मंदिरातील स्वच्छता व सुरक्षा विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली. अशा उपक्रमांमुळे महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास आणि त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यास निश्चितच मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली व सौमय्याश्री पुजार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय उत्तम व यशस्वीरीत्या पार पडला.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर संस्थानच्या स्वच्छता विभागाने विशेष परिश्रम घेतले. यावेळी मंदिर संस्थानचे जयसिंग पाटील, नागेश शितोळे, स्वच्छता निरीक्षक मनोज घोडके, सुरज घुले, सहायक स्वच्छता निरीक्षक नितीन भोयर, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, सहायक सुरक्षा निरीक्षक रिषभ रेहपांडे, श्रीकांत पवार तसेच आरोग्य विभागाचे डॉ. वैशाली काळे, श्री महेश पाठक, श्री शहाजी आवटे, श्री विनोद मोरे व UHWC मंदिर परिसरातील आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.









