करजखेडा चौकात भीषण अपघात; कार प्रवाशाचा मृत्यू, तिघे जखमी!
तुळजापूर प्रतिनिधी | अपघातांची मालिका औसा
राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 वर करजखेडा चौक परिसरात रविवारी (दि. 15 मार्च) दुपारी भीषण रस्ता अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन बसवंत पाटील (वय 55, रा. अलमला ता. औसा जि. लातूर) हे कार क्रमांक MH-24 AF-1599 मधून प्रवास करत होते. त्यांच्या सोबत चेतन माणिकराव बुके, मोहन वैजिनाथ बुके आणि नित्यानंद वैजिनाथ बुके (रा. शिवणी बु., ता. औसा जि. लातूर) हेही होते.
दरम्यान दुपारी सुमारे 12.30 वाजता करजखेडा चौरस्ता शिवारात बोलेरो जीप क्रमांक MH-45 AZ-5419 चा चालक संतोष अंकुश थोरवे (रा. पुनवर ता. करमाळा जि. सोलापूर) याने आपली गाडी भरधाव व निष्काळजीपणे चालवित कार क्रमांक MH-25 AW-4361 ला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर ती कार समोरून MH-24 AF-1599 या कारला जोरात धडकली.
या भीषण अपघातात जीवन पाटील गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर चेतन बुके, मोहन बुके व नित्यानंद बुके हे किरकोळ व गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी संगमेश्वर शंकर पाटील (वय 45, रा. अलमला ता. औसा जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) सह मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास बेंबळी पोलीस करत आहेत.अशा बेशिस्त कारचालकांविरोधात तसेच मद्यपान करून ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकांना कठोर दंड आणि शिक्षा करावी अशी मागणी होत आहे .






