Best News Portal Development Company In India

धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई , ७५० किलो ॲल्युमिनियम तारांसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त ८ गुन्हे उघड !

धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ,
७५० किलो ॲल्युमिनियम तारांसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त ८ गुन्हे उघड !
तुळजापूर | प्रतिनिधी ;-
धाराशिव जिल्ह्यातील विविध भागांत पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ७५० किलो मुद्देमाल जप्त केला आहे. या अटकेमुळे जिल्ह्यातील चोरीचे एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक १७ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, सपोनि कासार यांना गोपनीय माहिती मिळाली की, मांडवा (जि. धाराशिव) येथील दोन संशयित व्यक्तींनी पवनचक्कीच्या चोरीच्या तारा लपवून ठेवल्या आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून बालाजी उर्फ आवड्या अजिनाथ शिंदे (वय २४) आणि शहाजी भीमराव शिंदे (वय ३२) यांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी तुळजापूर आणि वाशी तालुक्यातील खालील भागांतून चोरी केल्याचे मान्य केले आहे:
तुळजापूर तालुका: नळदुर्ग, चिवरी, मानेवाडी.
वाशी तालुका: जिन्नर, दहिफळ शिवार.
तपासादरम्यान, या टोळीने पवनचक्कीच्या खांबांवरील तारा चोरल्याचे समोर आले. जिल्हा गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता, या संदर्भात आधीच ८ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी आरोपींकडून ७५० किलो वजनाच्या ॲल्युमिनियम तारा (किंमत ३,७५,००० रुपये) जप्त केल्या आहेत. आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांची नावेही पोलिसांना सांगितली असून, त्यांचा शोध सुरू आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकातील शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, शोभा बांगर, अशोक ढगारे, योगेश कोळी, नागनाथ गुरव व रत्नदीप डोंगरे यांनी फत्ते केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india