तुळजाभवानी मंदिरात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत; मंदिराच्या शिखरावर मानाची गुढी पूजित!
तुळजापूर (प्रतिनिधी): –
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होत आज तुळजापूर नगरीत मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्याचा सण अत्यंत भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या शुभ दिनाचे औचित्य साधून पहाटे श्री तुळजाभवानी मंदिराच्या सुवर्ण कलशावर परंपरेनुसार मानाची गुढी उभारण्यात आली.
आज पहाटे आई साहेबांची नियमित चरणतीर्थ पूजा संपन्न झाली. त्यानंतर महंत तुकोजी बुवा आणि महंत वाकोजी बुवा यांच्या शुभहस्ते व उपस्थितीत मंदिराच्या शिखरावर गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी देवीला साखरेचा हार अर्पण करून नवीन वर्षाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.अशीच कृपादृष्टी राहावी प्रार्थना करण्यात आली .अशाच धार्मिक परंपरा जपण्यासाठी तुळजापूर मंदिर संस्थान अग्रेसर असते .
या मंगलमयी सोहळ्यासाठी मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, पुजारी बांधव, तसेच मंदिर संस्थानचे विविध कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांना काळजीपूर्वक मदत केली गेली.
हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असल्याने तुळजाभवानी मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण धार्मिक शिस्त आणि पारंपरिक रीतीरिवाजांचे पालन करत उत्साहात पार पडला.







