वाचनालयाच्या वतीने प्रतिकात्मक पुस्तक गुढ्या उभारुन वाचन संस्कृतीचा जागर. तसेच पुस्तक वाचन नोंदवही बनवण्याचा संदेश.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीने प्रत्येक सण-उत्सवाला वाचन संस्कृतीचा जागर करणाऱ्या विधायक उपक्रमांची जोड देण्यात येते. दसऱ्याला हातात पुस्तके, लेखण्या व महामानवांचे फलक घेवून विवेकयात्रा, गणेशोत्सवाला पुस्तक वाचणारा गणपती, तसेच ग्रंथदिंडी, पुस्तकपालखी, ग्रंथतुला असे अनेक उपक्रम आजवर वाचनालयाच्या वतीने राबवले गेले आहेत.
सन २०२० पासुन गुढी पाडवा या सणाला जागोजागी “पुस्तक गुढी” उभारुन या गुढ्यांच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा जागर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यंदाही गुढी पाडव्याला उमरगा शहरातील अनेक घरांवर, वाचनालय व वाचन टपरी बाहेर तसेच शहराच्या मुख्य रस्त्यालगत प्रतिकात्मक पुस्तक गुढ्या उभारण्यात आल्या.
ज्याप्रमाणे दिवाळीला हिशेबाची वहिली बनवली जाते, त्याचप्रमाणे दरवर्षी गुढी पाडव्याला “पुस्तक वाचन नोंदवही” बनवण्यात यावी. या नोंदवहीत वर्षभर वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांच्या नोंदी व पुस्तकांचा थोडक्यात परिचय लिहून ठेवण्याचा संदेशही वाचनालयाच्या वतीने देण्यात येतो.
यंदाच्या पुस्तक गुढ्या उभारण्यासाठी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशनचे राजू बटगिरे, राजू भालेराव, ऍड. अर्चना जाधव, किशोर बसगुंडे, युसूफ मुल्ला यांनी पुढाकार घेतला.







