श्री तुळजाभवानी चरणी परभणी येथील भाविक भक्ताकडून सव्वादोन किलो चांदीची कळशी सेवा भावनेने अर्पण करण्यात आली!
तुळजापूर प्रतिनिधी :-महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी आपल्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणे आणि ती पूर्ण झाल्यानंतर देवीचरणी आपला नवसपूर्ती म्हणून
सेवा भावनेने दानधर्म करणे ही परंपरा अनादिकाला पासून चालत आलेले आहे. आई तुळजाभवानी आणि भाविक – भक्त यांचे एक अतूट नाते आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर येथे आज सकाळी पाथरी, जिल्हा परभणी येथील श्री तुळजाभवानी देवींचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी देवीच्या चरणी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी अर्पण केली.
वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी सुमारे सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली.
या प्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने वेदांत कुलकर्णी व त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विकास वाणी, महेश गंजे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. नवसाला पावणारी आई म्हणून श्री तुळजाभवानी देवीची जगभर ख्याती पसरलेली आहे.






