आमदार प्रवीण स्वामी यांनी घेतले श्री कल्लेश्वर देवाचे दर्शन; निंबाळा यात्रोत्सवात भक्तांचा जनसागर
तलमोड आनंद सुर्यवंशी.
कलदेव निंबाळा येथील श्री क्षेत्र कल्लेश्वर देवस्थानच्या वार्षिक यात्रेनिमित्त आमदार प्रवीण स्वामी यांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कल्लेश्वर चरणी माथा टेकवून मतदारसंघाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली, संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
याप्रसंगी आमदार स्वामी यांच्यासोबत भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश दाजी बिराजदार, युवा नेते अजिंक्य पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्री कल्लेश्वराची विशेष पूजा व आरती करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार प्रवीण स्वामी व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की, “धार्मिक उत्सव हे समाजात एकता आणि चैतन्य निर्माण करण्याचे माध्यम आहेत. श्री कल्लेश्वर देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, यात्रेच्या निमित्ताने होणारी ही भक्तांची गर्दीच येथील श्रद्धेची प्रचिती देते.” या सोहळ्याला बाळासाहेब स्वामी, आप्पाराव गायकवाड यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यात्रेनिमित्त निंबाळा गावात उत्साहाचे वातावरण असून मंदिर परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आलेल्या हजारो भाविकांसाठी देवस्थान समितीच्या वतीने दर्शनाची व महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती. युवा नेते अजिंक्य पाटील आणि सुरेश दाजी बिराजदार यांनीही यात्रेकरूंशी संवाद साधत उत्सवाच्या नियोजनाचे कौतुक केले.






