तुळजापुरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे दीड लाखांचे दागिने लंपास ; शहाजी महाद्वारासमोर अज्ञात महिलांची हातचलाखी !
तुळजापूर | प्रतिनिधी- गर्दीचा फायदा घेत
श्री क्षेत्र तुळजापूर येथे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. छत्रपती शहाजी महाद्वारासमोर गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात महिलांनी एका वृद्ध महिलेचे आणि त्यांच्या साथीदाराचे तब्बल १ लाख ६१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील माळी नगर येथील रहिवासी रेखा रमेश काळे (वय ६५ वर्षे) या २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्या आणि त्यांचे साक्षीदार दर्शनासाठी रांगेत असताना किंवा परिसरात वावरत असताना, छत्रपती शहाजी महाद्वारासमोर अज्ञात महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांवर हातसाफ केला. गर्दीची संधी साधून अत्यंत शिताफीने हे दागिने चोरण्यात आले.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच रेखा काळे यांनी तात्काळ तुळजापूर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी-रेखा रमेश काळे (वय ६५, रा. माळी नगर, ता. माळशिरस . जिल्हा. सोलापूर)
चोरी गेलेला मुद्देमाल: १,६१,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने.
दाखल कलम: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२).
तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पडताळणी करण्यात येत आहे.
मंदीर परिसरात दर्शनासाठी येताना आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि दागिन्यांची काळजी घ्यावी. संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाचा परिसर तपास करून पीडित महिलेला त्यांचे दागिने परत मिळावे अशी नागरिकांची मागणी आहे.






