येरमाळा येडेश्वरी यात्रेत भाविकांचे मंगळसूत्र लांबवणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ आरोपींना अटक !
तुळजापूर प्रतिनिधी ;- गर्दीचा फायदा घेत
येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी यात्रेमध्ये महिला भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या कारवाईत दोन महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १ लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मिळालेली माहिती अशी आहे की ,
दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी, येडेश्वरी यात्रेतील गर्दीमध्ये चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी आमराई मंदिर परिसरात दोन महिला व एक पुरुष संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली.
पकडण्यात आलेले आरोपी पाथरी (जि. परभणी) येथील रहिवासी असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत .
अनिल शेषेराव शिंदे (वय ३४ वर्ष)
सुनिता अनिल शिंदे (वय २९ वर्ष)
हिराबाई रमेश शिंदे (वय ४० वर्ष)
तपासादरम्यान आरोपींनी कबुली दिली की, येरमाळा-बीड हायवेवरील पुलाजवळ भाविकांच्या अंघोळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले जात होते. महिला आरोपी दागिने चोरून अनिल शिंदे याच्याकडे सोपवत असत. पोलिसांनी आरोपी अनिल शिंदे याच्याकडून चोरीचे ४ सोन्याचे मनी मंगळसूत्र हस्तगत केले आहेत.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, शोभा बांगर, महेबुब अरब आणि रोहीत दंडनाईक यांचा समावेश होता. चोर पकडले गेल्याने भाविकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तरी गरजेच्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.






