सावधान! १० ग्रॅम सोन्याचे आमिष दाखवून तुळजापुरात महिलेची फसवणूक; बनावट सोन्याच्या बदल्यात दागिने लंपास!
तुळजापूर (प्रतिनिधी): कोणाच्याही आमिषाला बळी पडू नका डोळ्यात अंजन घालणारी घटना.
धार्मिक क्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात भाविक आणि नागरिकांना लुटण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. १० ग्रॅम सोने स्वस्त दरात देण्याचे आमिष दाखवून एका ५६ वर्षीय महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ६ एप्रिल रोजी सकाळी १०:१५ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता रविंद्र तांबे (वय ५६ वर्ष, रा. कुंभारी, ता. तुळजापूर) या ६ एप्रिल रोजी सकाळी तुळजापूर येथील पुजारी मंगल कार्यालयासमोरील फुटपाथवरून जात होत्या. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून आपल्याकडे ‘१० ग्रॅम सोने’ असल्याचे सांगितले आणि ते त्यांना देण्याचे आमिष दाखवले.
तथापि, त्या बदल्यात फिर्यादी महिलेच्या कानातील सोन्याचे दागिने मागितले. अमिषाला बळी पडून अनिता तांबे यांनी त्यांच्या कानातील अंदाजे ४.८ ग्रॅम वजनाचे ‘फुल-झुमके’ (किंमत सुमारे २७,००० रुपये) त्या व्यक्तींना दिले. बदल्यात त्या इसमांनी महिलेला एक लोखंडी पट्टी दिली, जिला वरून सोन्यासारखा लकाकणारा पिवळा रंग (सोनेरी कोटिंग) लावलेला होता.
काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिता तांबे यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) तुळजापूर पोलिसांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्त्याने जाताना कुणीही अनोळखी व्यक्ती सोने देण्याचे किंवा पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत असेल, तर अशा थापांना बळी पडू नका. संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिसांनी सुद्धा कर्तव्यदक्षतेने अशा भामट्या चोरांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.






