धाराशिवचा शैक्षणिक डंका! श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य वैजनाथ घोडके यांना आंतरराष्ट्रीय ‘डी.एस्सी.’ पदवी बहाल!
तुळजापूर प्रतिनिधी : आपल्या शिस्तबद्ध वर्तन व अध्यापनाने आणि प्रशासकीय कौशल्याने शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणारे श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य श्री. वैजनाथ घोडके यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाची दखल घेत ‘युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका’ या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने त्यांना प्रतिष्ठित ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ (D.Sc.) ही पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्याची दखल
श्री. घोडके सरांच्या शैक्षणिक कार्याची शिफारस ‘डॉ. एस. राधाकृष्णन रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर’ (ऑल इंडिया टीचर्स वेल्फेअर असोसिएशन) यांच्यामार्फत करण्यात आली होती. त्यांच्या निरंतर सेवेची आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रयोगांची दखल थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष गौरव
या विशेष यशाबद्दल धाराशिवचे जिल्हाधिकारी माननीय श्री. कीर्ती किरण पुजार आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्रीमती माया माने यांच्या शुभहस्ते प्राचार्य घोडके यांना ही पदवी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घोडके सरांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“ही पदवी म्हणजे केवळ माझा सन्मान नसून, माझ्या विद्यार्थ्यांचा आणि संस्थेचा गौरव आहे. यामुळे शिक्षणाप्रती असलेली माझी जबाबदारी अधिक वाढली आहे.” असे मत डॉ. वैजनाथ घोडके (प्राचार्य) सर यांनी व्यक्त केले.
या यशामुळे श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाच्या परिवारात आणि जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तुळजापूर आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसाठी हा क्षण अभिमानाने मान उंचावणारा आहे.








