हुंड्यासाठी विवाहितेचा गळा आवळून खून; उमरग्यात खळबळ, आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल !
तुळजापूर (प्रतिनिधी): धाराशिव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होतेय. सदर प्रकरणाची गंभीर आणि दखल घेण्याची गरज आहे.
कर्ज फेडण्यासाठी आणि दुचाकीचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी एका २२ वर्षीय विवाहितेचा तिच्या पतीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उमरगा शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पलक दत्ता कांबळे (वय २२ वर्षे, मूळ रा. उजळंब, ता. बसवकल्याण, जि. बीदर, ह.मु. डिग्गी रोड, उमरगा) ही आरोपी पती दत्ता शामराव कांबळे (वय २७ वर्षे) याच्यासोबत उमरगा येथील अनुसया व्यंकट सूर्यवंशी यांच्या घरी भाड्याने राहत होती.
आरोपी दत्ता कांबळे हा स्वतःचे कर्ज फेडण्यासाठी आणि दुचाकीचे (टू-व्हीलर) दुकान सुरू करण्यासाठी पलककडे तिच्या आईकडून दोन लाख रुपये आणण्यासाठी वारंवार तगादा लावत होता. या पैशांच्या मागणीवरून तो पलकचा शारीरिक व मानसिक छळ करत असे.
गळा आवळून केली हत्या
दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:१९ वाजेपूर्वी, याच कारणावरून झालेल्या वादातून आरोपी दत्ता कांबळे याने पलकचा कशाच्या तरी साहाय्याने गळा आवळून निर्घृण खून केला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस कारवाई
या प्रकरणी केशव धनाजी शिंदे (वय ४३ वर्षे, रा. कुंभार पट्टी, उमरगा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपी दत्ता शामराव कांबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या खालील कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
कलम १०३(१) खुनासाठी शिक्षा.
कलम ८० आणि ८५ हुंडा छळ व संबंधित गुन्हे.
महत्त्वाची टीप: उमरगा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे उमरगा शहरात संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीस कठोर कठोर शिक्षा होण्याची मागणी होत आहे. हुंडाबळी सारख्या घटना आजचा डिजिटल युगात घडू नये म्हणून सर्वांनी समाज प्रबोधन करण्याची गरज आहे .






