उमरगा- कपडे घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरले आणि पावणे दोन लाखांवर डल्ला मारला!
तुळजापूर (प्रतिनिधी) : उमरगा येथे भर दिवसा ,
कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आलेल्या एका अज्ञात चोरट्याने दुकानदाराची नजर चुकवून चक्क १ लाख ९० हजार रुपयांची रोकड पळवल्याची धक्कादायक घटना उमरगा शहरातील मलंग कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुंबई येथील कुर्ला (ईस्ट) भागातील रहिवासी प्रविण दिनेश गेहलोत (वय २४) यांचे उमरगा येथील मलंग कॉम्प्लेक्समध्ये ‘पोशाख’ नावाचे कपड्यांचे दुकान आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रविण हे आपली १ लाख ९० हजार रुपये रोख रक्कम असलेली काळ्या रंगाची बॅग काउंटरच्या खाली ठेवून जेवण करण्यासाठी गेले होते.
त्याच वेळी एक अज्ञात इसम कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात शिरला. त्याने काउंटरवर असलेल्या फिर्यादीच्या भावाची नजर चुकवून अत्यंत शिताफीने काउंटरखाली ठेवलेली बॅग लंपास केली आणि तिथून पोबारा केला.
पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच प्रविण गेहलोत यांनी उमरगा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि. १९ एप्रिल २०२६ रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत. तरी मुख्य बाजारपेठेतील व्यापारी आणि सामान्य नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे अनुसूचित घटना दिसताच पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.






