Best News Portal Development Company In India

जनहित संघटनेच्या दणक्याने प्रशासन झुकले ; ८१ वर्षांच्या आजींचे उपोषण सुटले!

जनहित संघटनेच्या दणक्याने प्रशासन झुकले ; ८१ वर्षांच्या आजींचे उपोषण सुटले!
तुळजाई एक्सप्रेस :-बनावट ठरावाची दखल घेत.
गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांच्याशी शिष्टमंडळाची यशस्वी चर्चा ; अन्यायाविरुद्ध जनहितचा ‘प्रहार’ “गोरगरिबांचा कैवार आणि दिनदुखीतांचा आधार” हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत जनहित संघटनेने पुन्हा एकदा एका वृद्ध मातेसाठी धावून येत प्रशासनाला ठोस पाऊल उचलण्यास भाग पाडले. तब्बल ८१ वर्षांच्या वृद्ध आजींना आपल्या हक्कासाठी उपोषणाला बसावे लागल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर, जनहित संघटनेच्या शिष्टमंडळाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून हा प्रश्न निकाली काढला.
पंचायत समिती तुळजापूर समोर ८१ वर्षांच्या आजी उपोषणाला बसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. शासन, प्रशासन आणि राजकीय पुढाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच, सामाजिक कर्तव्य भावनेतून जनहित संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. आजींच्या डोळ्यांतील पाणी पाहून संघटनेच्या वतीने तातडीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री हेमंतजी भिंगारदिवे यांची भेट घेण्यात आली.
जनहित संघटनेच्या शिष्टमंडळाने भिंगारदिवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. “ज्या वयात आजींना आधाराची गरज आहे, त्या वयात त्यांना उपोषणाला बसावे लागते, हे प्रशासनाचे अपयश आहे,” अशा शब्दांत संघटनेने आपली बाजू मांडली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देत, गटविकास अधिकाऱ्यांनी आजींच्या मागणीवर समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आणि तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.
प्रशासनाने दिलेल्या ठोस आश्वासनानंतर जनहित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जाऊन आजींची भेट घेतली व त्यांना विश्वासात घेऊन उपोषण सोडण्यास विनंती केली. संघटनेच्या तत्परतेमुळे आजींना न्याय मिळाल्याने परिसरात जनहित संघटनेचे कौतुक होत आहे.
“अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचारावर प्रहार” करण्याचे आमचे ध्येय असून, सामान्यांच्या पाठीशी जनहित संघटना खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आणि या प्रकरणावर सकारात्मक प्रतिसाद तातडीने उपाययोजना करणाऱ्या पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री. हेमंतजी भिंगारदिवे साहेब यांच्यावरही जनसामान्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india