धक्कादायक- बेकायदेशीर पेट्रोल विक्रीने घेतला महिलेचा बळी ; उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथील घटना !
तुळजापूर (प्रतिनिधी):
ज्वलनशील पदार्थ वापरणे किंवा जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे व ते धोकादायक असल्याची माहित असताना सुद्धा किराणा दुकानात बेकायदेशीरपणे पेट्रोलची विक्री करणे एका महिलेच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना उमरगा तालुक्यातील व्हंताळ येथे घडली आहे. दिव्याच्या संपर्कात पेट्रोल आल्याने झालेल्या भीषण स्फोटात गंभीर भाजलेल्या पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, याप्रकरणी दुकानदारावर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महादेव जीवन चव्हाण (रा. व्हंताळ) हा त्याच्या किराणा दुकानात विनापरवाना ज्वलनशील पदार्थ पेट्रोलची विक्री करत होता. ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास, आरोपी हा दुकानात तंबाखूच्या पुड्या दिव्याच्या साहाय्याने पॅकिंग करत होता.
त्याच वेळी जवळच असलेल्या पेट्रोलने भरलेल्या बाटल्यांनी दिव्याच्या ज्योतीमुळे पेट घेतला. दुकानात गॅस सिलिंडर आणि फ्रीज असल्याने आगीचा मोठा भडका उडाला आणि स्फोट झाला.
या आगीच्या भीषण घटनेत दुकानाजवळ असलेल्या कमल गणपती मुळे (रा. व्हंताळ) यांच्या कपड्यांनी पेट घेतला. त्या या घटनेत गंभीररीत्या भाजल्या गेल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा बालाजी गणपती मुळे (वय ३१, रा. कात्रज, पुणे) यांनी २१ एप्रिल २०२६ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी महादेव चव्हाण विरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास पोलीस करत आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम: १०६ (१) (बेजबाबदारपणामुळे मृत्यू घडवून आणणे), २८७ (अग्निशमन किंवा ज्वलनशील पदार्थाबाबत निष्काळजीपणा).
अत्यावश्यक वस्तू अधिनियम: कलम ३ आणि ७.
रहिवासी भागात किंवा दुकानात विनापरवाना पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांची साठवणूक करणे हा गंभीर गुन्हा असून, यामुळे मोठ्या जीवितहानीचा धोका असतो. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. अशा ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.कायद्याच्या योग्य प्रकारे सन्मान करत बेकायदेशीर धंद्यांना थारा देऊ नये.







