नळदुर्ग परिसरात पवनचक्कीवर डल्ला ; ३५ लाखांचे नुकसान करून कॉपर वायरची चोरी !
तुळजापूर (प्रतिनिधी):-
नळदुर्ग परिसरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणारी ही घटना आहे . तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा शिवारात अज्ञात चोरट्यांनी हैदोस घालत पवनचक्कीच्या ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या घटनेत चोरट्यांनी केवळ साहित्य चोरलेच नाही, तर ट्रान्सफॉर्मरमधील हजारो लिटर ऑईल सांडून एकूण ३५ लाख रुपयांचे नुकसान केले असून, याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिकुंद्रा शिवारातील लोकेशन आर.एस.एल. या पवनचक्कीवर दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पवनचक्कीच्या ट्रान्सफॉर्मरमधील २,६०० लिटर ऑईल काढून टाकले, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे निकामी झाला. या ऑईलची किंमत सुमारे २,८०,८०० रुपये इतकी आहे.
मोठ्या प्रमाणावर तोडफोड आणि चोरी
चोरट्यांनी केवळ ऑईलचेच नुकसान केले नाही, तर ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर आणि बस बार अंदाजे १,००,००० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. एकूण नुकसान- ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्याने आणि साहित्याची चोरी झाल्याने एकूण ३५,००,००० (पस्तीस लाख) रुपयांचा फटका बसला आहे.
या प्रकरणी फिर्यादी पांडुरंग माणिक गरड (वय ३५ वर्षे, रा. चिकुंद्रा) यांनी २२ एप्रिल रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३२४(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.
चिकुंद्रा परिसरात पवनचक्क्यांच्या साहित्याची चोरी होण्याच्या घटना वाढल्या असून, यामुळे संबंधित कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या टोळीचा लवकरात लवकर छडा लावावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.काल परवाच एक मोठी चोरीची घटना घडली होती तिचा तपास चालू असतानाच ही दुसरी घटना नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. अशा मोठ्या चोऱ्यांचा तपास करण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवरती आहे. नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करण्याची मागणी होत आहे.





