Best News Portal Development Company In India

मुंबई शहर पोलीस दलात भरारी करमाळ्याच्या मुस्कान राज हिचे जिद्द आणि चिकाटीचे प्रेरणादायी उदाहरण -भाजप नगरसेविका सौ स्वातीताई फंड!

*मुंबई शहर पोलीस दलात भरारी करमाळ्याच्या मुस्कान राज हिचे जिद्द आणि चिकाटीचे प्रेरणादायी उदाहरण -भाजप नगरसेविका सौ स्वातीताई फंड*
अविनाश जोशी /करमाळा करमाळ्याच्या मुस्कान राज हिचे जिद्द आणि चिकाटीचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मत भाजप नगरसेविका सौ स्वातीताई फंड यांनी व्यक्त केले.गंवडी गल्ली येथील मुस्कान रिझवान गफुर राज हिचा सत्कार भाजप नगरसेविका सौ स्वातीताई फंड सामाजिक कार्यकर्ते महादेव आण्णा फंड यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना सौ स्वातीताई फंड म्हणाल्या की प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, हे करमाळा येथील मुस्कान राज हिने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या मुस्कानची मुंबई शहर पोलीस दलात निवड झाली असून तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्कान ही गफुर राज आणि रिझवाना राज यांची कन्या आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील तिच्या आई-वडिलांनी तिच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. वडील गफुर राज हे गवंडी काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई रिझवाना राज या गृहिणी असून इतरांच्या घरी स्वयंपाकाची कामे करून कुटुंबाला हातभार लावतात.
मुस्कानचे प्राथमिक शिक्षण नगरपालिका प्राथमिक मुलींच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण कन्या शाळेत पूर्ण करत तिने अकरावी व एफ.वाय.चे शिक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात घेतले. शिक्षणासोबतच तिने पोलीस भरतीची तयारी सातत्याने सुरू ठेवली.
पोलीस भरतीसाठी तिने करमाळा येथील युनिव्हर्सल अकॅडमी तसेच जेऊर येथील योद्धा अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. या प्रवासात योद्धा अकॅडमीचे नवनाथ नाईक नवरे आणि युनिव्हर्सल अकॅडमीचे तांबे सर यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने शारीरिक व लेखी परीक्षेची काटेकोर तयारी केली.
अथक मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर मुस्कानने पहिल्याच प्रयत्नात मुंबई शहर पोलीस भरतीत यश मिळवले. तिच्या या यशामुळे करमाळा परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्कानचे यश हे आजच्या तरुणाईसाठी विशेषतः मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. प्रतिकूल परिस्थिती असली तरी योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे तिच्या यशातून तिने आपल्या कर्तुत्वामधून सिद्ध केले आहे .
तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india