Best News Portal Development Company In India

उमरगा तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण !

उमरगा तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त उमरगा येथील तहसील कार्यालयात (दि.१) मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ मोठ्या उत्साहात आणि देशप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. या मुख्य शासकीय समारंभात उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय प्रवीण स्वामी सरयांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली आणि राष्ट्रगीताच्या सुरांनी परिसर भारावून गेला होता.
या सोहळ्याला उमरगा उपविभागीय अधिकारी (एसडीएम) दत्तू शेवाळे आणि तहसीलदार गोविंद येरमे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन प्रशासकीय पातळीवर अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले होते. ध्वजारोहणानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना आमदार प्रवीण स्वामी यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे आणि महापुरुषांचे स्मरण केले.
या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे देशसेवेतून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा असलेला गौरवपूर्ण सहभाग. माजी सैनिक शहाजी चालुक्य, बलभीम पाटील, अशोक सुरवसे यांच्यासह तालुक्यातील अनेक माजी सैनिक या सोहळ्यास सन्मानाने उपस्थित होते. आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या या वीरपुत्रांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. यावेळी माजी सैनिकांच्या त्याग आणि समर्पणाचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान केला.
या सोहळ्याला माजी खासदार रवींद्रजी गायकवाड,पंचायत समिती सभापती एड आकांक्षा चौगुले व तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसील कार्यालयाचा परिसर सुशोभित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी तहसीलदार गोविंद येरमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सर्वांनी एकत्रितपणे ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत हा दिवस साजरा केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india