सावधान! उमरगा बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत दागिन्यांची चोरी; महिलेला ६० हजारांचा फटका !
तुळजापूर (प्रतिनिधी):-
धाराशिव जिल्ह्यात एसटी बस स्टँड वरती चोऱ्यांचे प्रमाण वाढले. सोन्याचे दरही गगनाला भिडले त्यामुळे भूरटे चोर सोने चोरी करून पसार होतात . एसटी बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. उमरगा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुजाता बालाजी जामगे (वय ३५ वर्षे, रा. तुगाव, ता. उमरगा) या दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास उमरगा बसस्थानकावर आल्या होत्या. त्यांना उमरगा ते सोलापूर या बसने प्रवास करायचा होता. बस स्थानकावर लागली असता, प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सुजाता यांच्या पर्समधील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने शिताफीने चोरून नेले.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच सुजाता जामगे यांनी उमरगा पोलीस ठाणे गाठले. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दि. २ मे २०२६ रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांना आवाहन:
बसस्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि दागिन्यांची काळजी घ्यावी. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एसटी महामंडळानेही सतर्कता बाळगून याच्यावरती ठोस पावले उचलण्याची गरज आहे जेणेकरून प्रवाशांना प्रवासात कोणताही त्रास होणार नाही. असे प्रवाशातून बोलले जात आहे.






