उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गौरव; पारंपरिक खेळांच्या सादरीकरणाने रंगले उन्हाळी शिबिर उद्घाटन
उमरगा /लोहार प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा मध्ये दहावी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच अमन स्पोर्ट्स क्लब व गुरुकुल आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शकुंतला मोरे, सुजाता मोरे, प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे, क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर, मुनीर शेख, श्याम दुधभाते, प्रताप राठोड व सोनाली मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन महम्मद रफी शेख यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. उद्घाटनानंतर उन्हाळी शिबिरातील विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी, कराटे आणि लेझीम यांसारख्या पारंपरिक व साहसी खेळांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे अवघ्या अडीच वर्षांच्या राम या बालकाने केलेल्या लाठी सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी उमरगा तालुक्यात शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या गायत्री पाटील तसेच ९८ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या शिवलिला बिराजदार या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेमधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या मुस्तफा व्हंताळे, माहीन शानेदिवान, अभिजीत शेरीकर, आलम मुल्ला आणि श्रेयशी शिंदे या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात गणेश पवार व संजय कोथळीकर यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्माकर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन मुनीर शेख यांनी तर आभार प्रदर्शन महम्मद रफी शेख यांनी केले.
या कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.






