तुळजाभवानी मंदिरातील भाविक महिलांचे मणीमंगळसूत्र चोरणारी टोळी गजाआड ; ८ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी :- धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची सर्वात मोठी आणि धाडसी कारवाई. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तुळजापूर आणि येरमाळा येथील मंदिरांमध्ये येणाऱ्या भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण आणि मणीमंगळसूत्र चोरणाऱ्या एका सराईत आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दिनांक १ मे २०२६ रोजी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात एका भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले होते.
दिनांक १५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव टोल नाका (वाशी) येथे सापळा रचण्यात आला. तेथून पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या ०२ महिला आणि ०२ पुरुषांना त्यांच्या ‘महिंद्रा स्कॉर्पिओ’ कारसह शिताफीने ताब्यात घेतले. २७ ग्रॅम सोने आणि स्कॉर्पिओ कार जप्त
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या अन्य साथीदारांच्या मदतीने तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ कार आणि इतर मुद्देमाल.
असा एकूण ८,३८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे तुळजापूर येथील ०१ आणि येरमाळा येथील ०३ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे.
१) अनिता सुनिल शिंदे
२) हिराबाई रमेश शिंदे
३) चिरंजीव रमेश शिंदे
४) किरण शेषेराव शिंदे
(सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल येरमाळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पो .ह. जावेद काझी, पो .ह. फरहान पठाण, मपोह शोभा बांगर, मपोकॉ बहिरवाड (पोस्टे वाशी), चापोह रत्नदिप डोंगरे आणि नागनाथ गुरव यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.
सदरील धाडसी कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलीस कौतुकास पात्र ठरत आहेत.






