Best News Portal Development Company In India

वारंवार बस रद्द, ई-बस बंद पडणे, चार्जिंग स्टेशनचा प्रश्न; ऍड. शीतल चव्हाण यांची प्रतिक्रिया!

*वारंवार बस रद्द, ई-बस बंद पडणे, चार्जिंग स्टेशनचा प्रश्न; ऍड. शीतल चव्हाण यांची प्रतिक्रिया*

*उमरगा आगारातील एस. टी. सेवेचा बोजवारा; प्रवाशांच्या अडचणी एकत्रित मांडण्याचे आवाहन*

तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
उमरगा आगारातील एस. टी. सेवेबाबत प्रवाशांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून वारंवार बस फेऱ्या रद्द होणे, वेळापत्रकाचा बोजवारा उडणे, ई-बस मध्ये तांत्रिक बिघाड होणे आणि प्रवाशांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे या समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ऍड. शीतल शामराव चव्हाण यांनी नागरिकांना आपापल्या अडचणी पुढे मांडण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत माहिती देताना ऍड. चव्हाण यांनी सांगितले की, आज सकाळी सात वाजता उमरग्याहून परळीला जाणारी एस. टी. बस स्थानकावर लागली होती. प्रवासी बसमध्ये बसल्यानंतर जवळपास आठ वाजता अचानक गाडी रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. अशा प्रकारे अनेकदा फेऱ्या रद्द होत असून विद्यार्थी, महिला, रुग्ण, कामगार आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

या संदर्भात आगार प्रमुख श्री. कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असता, चार्जिंग स्टेशनची अपुरी व्यवस्था असल्यामुळे ई-बस वारंवार बंद पडतात आणि त्यामुळे काही फेऱ्या रद्द कराव्या लागत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे ऍड. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार मा. प्रवीण स्वामी यांनाही या सर्व अडचणींबाबत माहिती देण्यात आली असून त्यांनी आगार प्रमुखांना बैठक घेण्याबाबत पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, बैठक घेण्यापूर्वी नागरिकांना प्रत्यक्ष येणाऱ्या सर्व अडचणी समजून घेणे, त्या एकत्रित करणे आणि त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी सामूहिक पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“आपल्याला स्वतःला आलेल्या किंवा इतरांकडून समजलेल्या एस. टी. सेवेतील अडचणी नागरिकांनी पुढे मांडाव्यात. सामूहिकपणे पाठपुरावा केल्यास अनेक प्रश्न सोडवून घेता येऊ शकतात,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, यापूर्वी बसस्थानक परिसरातील पिण्याचे पाणी, सावली, बैठक व्यवस्था आदी मूलभूत सुविधांबाबत दिलेल्या निवेदनानंतर काही प्रमाणात सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आता दर्शनी भागात आणखी एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन आगार प्रमुख श्री. कुलकर्णी यांनी दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india