धडाकेबाज कामगिरी! चालत्या ट्रकमधून चोरलेल्या २ लाखांच्या मेंढ्या २४ तासांत जप्त; धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचा थरारक पाठलाग!
तुळजापूर प्रतिनिधी :- धाराशिव जिल्ह्यात फिल्मी ड्रामा थरारक पाठलाग नंतर हायटेक चोरीची घटना उघड.चालत्या ट्रकमधून फिल्मी स्टाईलने मेंढ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवेवर घडलेल्या या धाडसी चोरीप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत ₹२,०९,००० किमतीच्या मेंढ्यांसह एकूण ₹३,१९,००० चा मुद्देमाल जप्त केला आहे.
दिनांक २३ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास हायवेवरून जाणाऱ्या एका चालत्या ट्रकमधून अज्ञात चोरांनी अत्यंत चलाखीने मेंढ्या चोरून नेल्या होत्या. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांनी तात्काळ तपास चक्रे फिरवून चोरांचा शोध घेण्याचे आदेश दिले. बाभळीच्या झाडाखाली सापडला सुगावा, पोलिसांनी चोरांचा थरारक पाठलाग सुरू केला.
तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा (LCB), आरसीपी (RCP) पथक क्रमांक १ आणि क्यूआरटी (QRT) चे संयुक्त पथक येरमाळा हायवे परिसरात रवाना झाले. यादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. तेरखेडा लक्ष्मी पारधी पिढी आणि उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरल्या असून, त्या उमरा पिढीजवळ बाभळीच्या झाडाखाली एका लाल रंगाच्या टमटममध्ये लपवून ठेवल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. भालेराव साहेब व त्यांच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सापळा रचला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता, तेथे बाभळीच्या झाडाखाली एक लाल रंगाचे टमटम आणि शेजारी ७ ते ८ संशयित इसम बसलेले दिसले. पोलिसांची गाडी पाहताच चोरांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी चोरांचा थरारक पाठलाग केला, परंतु झाडीझुडपांचा फायदा घेऊन ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या लाल टमटमची तपासणी केली असता त्यात चोरीला गेलेल्या मेंढ्या आढळून आल्या. मूळ फिर्यादीला फोन करून मेंढ्यांचे वर्णन विचारले असता, त्यांनी या मेंढ्या त्यांच्याच ट्रकमधून चोरीला गेल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी मेंढ्या आणि लाल रंगाचे टमटम असा एकूण ₹३,१९,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, येरमाळा पोस्टेचे सपोनि तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोह शोभा बांगर, पोना संतोष तिघाडे, संदीप चौघुले, रोहीत दंडनाईक तसेच RCP पथक क्र. १ आणि QRT च्या जवानांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. सध्या फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. सदरील कारवाईने पोलिसांचे हात लांब असतात हे स्पष्ट झाले.तसेच स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.कोठेही संशयस्पद हालचाल दिसल्यास पोलिसांची त्वरित संपर्क करावा.नागरिकांनी सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे.






