चिंचकोटच्या लेकीची ‘खाकी’त उत्तुंग भरारी; सुप्रिया सगर यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक( PSI )पदी निवड.
‘विमलाई फाउंडेशन’तर्फे सत्कार…
तूरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
परिस्थितीवर मात करत, घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळून तालुक्यातील चिंचकोट (ल.) येथील सुप्रिया दिलीप सगर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या (MPSC) परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल ‘कै. विमलाई श्रीमंतराव सगर सोशल फाउंडेशन’च्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुप्रिया सगर या सध्या नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलीस ठाण्यात सेवेत कार्यरत आहेत.
सुप्रिया सगर यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले असून, त्यांनी उमरगा येथील श्रमजीवी कॉलेजमधून बी.एस्सी. (B.Sc.) पदवी पूर्ण केली. एका शेतकरी कुटुंबातून पुढे येत त्यांनी हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या दोन्ही लहान बहिणी देखील सध्या महाराष्ट्र पोलीस दलात सेवा बजावत आहेत. या सत्कार समारंभात सुप्रिया यांच्यासह त्यांच्या माता-पिता व पती भागवत सगर यांचाही गौरव करण्यात आला.
परिस्थिती कधीच अडचण बनू शकत नाही – PSI सुप्रिया सगर
सत्काराला उत्तर देताना आणि उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुप्रिया सगर भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “कोणतेही ध्येय गाठताना परिस्थिती कधीच अडचण बनू शकत नाही. मनात चिकाटी, निश्चित ध्येय आणि अभ्यासात सातत्य असेल तर यश नक्की मिळते. मी स्वतः लहान मूल असताना, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून हे यश मिळवले आहे.”
अन्यायग्रस्त गोरगरीब वंचित उपेक्षितांना भटके यांना योग्य तो न्याय द्यावा – प्रा. किरण सगर
यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. किरण सगर यांनी सुप्रिया सगर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मातोश्रींच्या सविताआई सगर यांच्या सह सत्कार करताना त्यांनी सत्कार मुर्ती सुप्रियास सगर यांचा कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ आणि संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्मित ‘भारताचे संविधान’ ही पुस्तके भेट देण्यात आली. या पुस्तकांतील विचारांचे पालन करून, कर्तव्यावर असताना कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीवर नकळत ही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय सगर यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन स्वाती वाडीकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री. ज्ञानेश्वर माणिकवार सर यांनी मानले. या सोहळ्याला श्री. पुदाले साहेब, जेष्ठ समाजसेविका सविताबाई सगर , माणिकवार सर, महेश जाधव सर, सौ. मीरा सगर यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







