धाराशीव पोलिसांची मोठी कारवाई! तुळजापूर-बीड बायपासवरील तीन पत्ती क्लबवर धाड, ११ आरोपींसह लाखांचा मुद्देमाल जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:-धाराशिव जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धाराशीव पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. शहरालगत असलेल्या तुळजापूर-बीड महामार्ग बायपासजवळ छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या एका ‘तीन पत्ती’ (तिरट) जुगार क्लबवर पोलिसांनी गुरुवारी (२८ मे) धडक छापेमारी केली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ११ आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून वाहनांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर परिसरात अवैधरित्या जुगार क्लब चालवला जात असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. ११ जणांवर गुन्हा दाखल; वाहनांसह मुद्देमाल जप्त. या धाडसी कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ११ आरोपींना ताब्यात घेतले. या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम ४ आणि ५ नुसार धाराशीव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोकड रक्कम: ₹३७,७७०/- रोख, १ चारचाकी आणि १० दुचाकी वाहने, जुगाराचे साहित्य आणि वाहनांसह एकूण ₹३,९०,७७०/- (तीन लाख नव्वद हजार सातशे सत्तर रुपये) किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
ही यशस्वी कारवाई परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री. विजय आटोळे, क्यूआरटी (QRT) अंमलदार आणि पोलीस चालकांच्या पथकाने केली.
”धाराशीव जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध व्यवसाय खपवून घेतले जाणार नाहीत. कुठेही अवैध धंदे सुरू असल्याचे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध यापुढेही अशीच अत्यंत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा पोलीस अधीक्षक श्रीमती रीतु खोखर यांनी दिला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही ठिकाणी अवैध धंदे किंवा अवैद्य हालचाली दिसताच पोलिसांची संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.






